ठाणे : अशोक घाग
भिवंडी-ठाणे मार्गावरील मानकोली पुलाजवळील अंतर्गत रस्त्यावर मालाने भरलेला एक अवजड टँकर उलटल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकरची डाव्या बाजूची चाके थेट उघड्या गटारात घसरली. या भीषण अपघातामुळे कालपासूनच मानकोली पुलावर आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त करत, जर आज एवढा मोठा ट्रक गटारात कोसळू शकतो, तर दुचाकी आणि कार चालकांचीही तीच अवस्था व्हायला फारसा वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे. महापालिका आणि संबंधित प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी या गटारांची योग्य प्रकारे बांधणी, स्वच्छता किंवा आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पावसाळा सुरू झाल्यावर येथील रस्ते पूर्णपणे जलमय होऊन स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना आणखी मोठ्या गैरसोयीचा तसेच गंभीर अपघातांचा सामना करावा लागेल, अशी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.







