मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज ३१ मार्च २०२६ हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी राहिल्या आहेत किंवा ज्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांना आज रात्री १२ वाजेपर्यंत सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मुदत आज संपत असून यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, त्यामुळे लाभार्थी महिलांची धावपळ उडालेली पाहायला मिळत आहे.
राज्यात या योजनेसाठी सुरुवातीला सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांनी नोंदणी केली होती, मात्र प्रशासकीय पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर सध्या १ कोटी ७६ लाख महिलाच पात्र ठरल्याचे दिसत आहे. उर्वरित ७१ लाख महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे अद्यापही त्रुटींच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बँक खात्याला आधार लिंक नसणे, अर्जातील नावामध्ये तफावत असणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे यांसारख्या तांत्रिक बाबींचा समावेश आहे. आज रात्रीपर्यंत या त्रुटी दूर न झाल्यास हे ७१ लाख अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी आज मुदतीपूर्वी आपल्या अर्जातील चुका दुरुस्त केल्या, त्यांना त्यांचे गेल्या तीन महिन्यांचे रखडलेले एकूण ४५०० रुपये हप्त्याच्या स्वरूपात एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही दुरुस्ती न केल्यास संबंधित महिलांना एप्रिल महिन्यापासून मिळणाऱ्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहावे लागेल. अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी येत असल्याने महिलांनी शक्य तितक्या लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे.







