पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई नजीक मातीचा ओसारा आल्याने प्रशासनाने एकेरी वाहतूक सुरू केली आहे. हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान दोन किलोमीटरच्या पट्ट्यात ही एकेरी वाहतूक सुरू आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कशेडी घाटातील डोंगराचा मोठा भाग उभा कापल्यामुळे चोळई हद्दीत दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावर जिथे रस्त्याचे काम सुरू आहे, तिथे मोठमोठे दगड रस्त्यावर आले असून तिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे. यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.संबंधित ठेकेदार कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर खडी टाकून ये-जा करण्याची सोय केली आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण न झाल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्यास संपूर्ण महामार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







