जयपूर :
जयपूरमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) शाळा पाहणी दौऱ्याला मोठा आणि हिंसक विरोध होताना दिसत आहे. बगरू येथील रामपुरा कंवरपुरामध्ये एका सरकारी प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले ‘सीजेपी’चे सह-समन्वयक आणि प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आज गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. संतप्त गावकऱ्यांनी रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेकही केली. तसेच, तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी ‘सीजेपी’च्या महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर चिखल आणि माती फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेदरम्यान ‘सीजेपी’चे कार्यकर्ते आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी या कार्यकर्त्यांना गावातून हुसकावून लावले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत थेट सरकारी शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून रस्ता अडवला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्ता बंद केल्यानंतर गावकरी तिथून जाणाऱ्या इतर वाहनांची तपासणीही करत होते.
घटनास्थळी उपस्थित असलेले गावकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, ते या शाळेची दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने करतील. तसेच, या कामासाठी सरकारनेही १२.५० लाख रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. ‘सीजेपी’चे लोक इथे येऊन केवळ राजकीय स्वार्थापोटी वातावरण बिघडवू पाहत आहेत आणि ते कोणत्याही किंमतीवर खपवून घेतले जाणार नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तसेच, इथून पुढे कोणत्याही बाहेरील व्यक्तीला गावात येऊ देणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, ‘सीजेपी’चे हे पथक जयपूरमधील दोन सरकारी शाळांचा दौरा करणार होते, ज्यामध्ये रामपुरा येथील याच शाळेचा समावेश होता.
रामपुरा गावातील या सरकारी शाळेची इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याने ती मुलांसाठी बंद करण्यात आली आहे. जुन्या इमारतीचे बीम तुटले असून त्यांना केवळ लोखंडी अँगलचा आधार देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या ही शाळा तेथून ५० मीटर अंतरावर एका वाड्यात हलवण्यात आली आहे, जिथे विद्यार्थ्यांना अक्षरशः टिनच्या शेडखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. ज्या ठिकाणी मुलांचे वर्ग भरत आहेत, तिथेच जनावरांचा चारा ठेवलेला असून आजूबाजूच्या भिंतींच्या विटाही पडलेल्या अवस्थेत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

