मुंबई : प्रतिनिधी
भारतीय नौदलाच्या सागरी ताकदीत आणखी एक मोठी भर पडली आहे. खोल समुद्रातील गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अत्याधुनिक ‘आयएनएस निपुण’ हे जहाज सोमवारी मुंबईत औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले. नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडला. गेल्या वर्षी नौदलाच्या सेवेत रुजू झालेल्या ‘आयएनएस निस्तार’ नंतर या श्रेणीतील हे दुसरे विशेष जहाज असून, यामुळे समुद्राच्या अथांग खोलीत देशाचे सामरिक स्थान अधिक मजबूत होणार आहे.
संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या या जहाजाचे डिझाईन आणि बांधणी विशाखापट्टणम येथील ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ने केली आहे. हे भव्य जहाज ११९.४ मीटर लांब असून त्याचे वजन सुमारे १०,५०० टन आहे. ‘आयएनएस निपुण’मुळे नौदलाची खोल समुद्रातील डायव्हिंग (गोताखोरी), पाणबुडी बचाव आणि पाण्याखालील सुरक्षा मोहिमांची क्षमता कैकपटीने वाढली आहे. हे जहाज समुद्रात तब्बल ३०० मीटर खोलीपर्यंतच्या डायव्हिंग मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मदत कार्यांमध्येही याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करता येणार आहे.
या जहाजाचे ब्रीदवाक्य ‘फार बिनीथ, फ्यु बियॉन्ड’ (Far Beneath, Few Beyond – अथांग खोलीत, सर्वांच्या पुढे) असे आहे, जे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या नौसैनिकांच्या अदम्य साहसाचे प्रतीक आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, रिमोटने चालवली जाणारी विशेष वाहने (ROVs) आणि प्रगत डायव्हिंग सिस्टीमने सुसज्ज असलेले हे जहाज खोल पाण्यात बचाव वाहने नेण्यासही सक्षम आहे. नौदल प्रमुखांनी स्पष्ट केले की, या विशिष्ट क्षमतेमुळे भारत आता केवळ स्वतःच्याच नव्हे, तर मित्र राष्ट्रांच्या संकटात सापडलेल्या पाणबुड्यांना मदत करण्यासाठीही पूर्णपणे सज्ज झाला आहे. यासोबतच, या संपूर्ण सागरी क्षेत्रात भारत एक विश्वासार्ह ‘पाणबुडी बचाव भागीदार’ (Submarine Rescue Partner) म्हणून उदयास आला आहे.



