पुणे :
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिसांना मोठा दणका दिला आहे. आयोगाने दोन गंभीर प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. यामध्ये एका खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींना गाडीच्या बोनेटला बांधून त्यांची धिंड काढणे आणि दुसऱ्या एका प्रकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यांवर बसवून व चालवून मारहाण करणे या घटनांचा समावेश आहे. या घटना मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे मानत आयोगाने पुणे पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि साहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे हे आरोपींसोबत अशा अमानवीय वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी व मानवाधिकार उल्लंघनासाठी जबाबदार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
प्रकरणाची वाढती गंभीरता लक्षात घेता, मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे (डीजीपी) पुणे पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस यंत्रणेकडून न करता अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) किंवा त्याहून वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता अल्पवयीन आरोपींसोबत केलेले कथित दुर्व्यवहार आणि सार्वजनिक ठिकाणी आरोपींचा झालेला अपमान यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर मानवाधिकार आयोगाने घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.



