मुंबई :
महाराष्ट्रात पान मसाला आणि गुटखा विक्रीवर कडक बंदी असतानाही ‘विमल इलायची’च्या माध्यमातून पान मसाल्याची छुपी जाहिरात केल्याप्रकरणी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना मोठा दणका दिला आहे. एफडीएने या तिन्ही अभिनेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, पंधरा दिवसांच्या आत याबाबतचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट रोजी या तिन्ही कलाकारांना तब्बल नऊ पानांची नोटीस पाठवण्यात आली असून या कारवाईमुळे मनोरंजन आणि जाहिरात विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, २०२४ मध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे ‘विमल इलायची’च्या एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. एफडीएच्या नोटिशीनुसार, ही केवळ वेलचीची जाहिरात नसून यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ या ब्रँडचे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केले जात आहे. ‘विमल’ हे नाव प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडले गेले असल्याने, अशा जाहिरातींमुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाने या तिन्ही कलाकारांना सदर जाहिरातीचे प्रसारण तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल कंटेंट त्वरित हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एफडीएने या कलाकारांकडून काही महत्त्वपूर्ण माहिती मागवली आहे. यामध्ये जाहिरात कंपनीसोबत झालेले करारनामे, आर्थिक व्यवहाराची माहिती आणि जाहिरात स्वीकारण्यापूर्वी त्यांनी कोणती कायदेशीर शहानिशा केली होती, याचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत १० ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, प्रशासनाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित कलाकारांवर पुढील तीन वर्षांसाठी कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यावर बंदीही घातली जाऊ शकते.



