चिपळूण : प्रतिनिधी
निवडणुका म्हटल्या की हार-जीत ही ठरलेलीच असते. मात्र, काही पराभव हे उमेदवारांच्या जिव्हारी लागतात. असाच काहीसा प्रकार चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर समोर आला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी चक्क आपल्या दुकानाबाहेर *”कोणीही देणगी मागायला येऊ नये”* अशा आशयाचा फलक लावला असून, सध्या या फलकाची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
नेमका प्रकार काय?
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात होते. या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसकडून आयत्यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिंदे यांनी जोमाने प्रचारही केला, मात्र मतपेटीतून त्यांना अपेक्षित कौल मिळू शकला नाही. या निवडणुकीत त्यांचा दणकून पराभव झाला. शिंदे यांनी चिपळूण नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पद भूषवले आहे. तसेच बराच काळ नगरसेवक राहिलेले आहेत.
पती-पत्नी दोघांचाही पराभव
सुधीर शिंदे यांच्यासाठी हा पराभव दुहेरी धक्का देणारा ठरला. एकीकडे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत ते पराभूत झाले, तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक ११ मधून उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीलाही पराभवाचा सामना करावा लागला. एकाच वेळी पती आणि पत्नी दोघांचाही पराभव झाल्याने शिंदे यांना मोठा धक्का बसला.
मनाला लागलेला पराभव आणि ‘तो’ फलक
जनतेने दिलेला हा कौल सुधीर शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. चिपळूणच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असल्याने त्यांना विजयाची खात्री होती. मात्र या पराभवामुळे ते प्रचंड व्यथित झाले आहेत. याच भावनेतून त्यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे यांनी आपल्या दुकानाबाहेर एक भलामोठा बोर्ड लावला असून त्यावर, “कोणीही देणगी मागायला येऊ नये” असा स्पष्ट विनंती वजा संदेश लिहिला आहे.
निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करूनही पदरी निराशा पडल्याने उमेदवाराची झालेली ही चिडचिड सध्या चिपळूणमध्ये कुतूहलाचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर आणि नाक्यानाक्यावर आता सुधीर शिंदे यांच्या या अनोख्या ‘निषेधाची’ चर्चा सुरू आहे.



