मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण भागातील वादळाचा मोठा फटका बसला. मात्र वैमानिकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर उतरवण्यात आले. या घटनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व प्रवासी सुखरूप असून एक मोठा अनर्थ टळला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी ३.३० वाजता मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कौटुंबिक लग्नकार्यासाठी ते निघाले होते. मात्र हेलिकॉप्टर ऐरोलीच्या परिसरापर्यंत पोहोचले असता समोरून येणाऱ्या भीषण वादळाचा अंदाज वैमानिकाला आला. हवेतील संभाव्य धोका ओळखून वैमानिकाने तत्काळ उपमुख्यमंत्री शिंदे यांना परिस्थितीची कल्पना दिली. पुढील प्रवास धोकादायक ठरू शकतो हे लक्षात घेऊन वैमानिकाने हेलिकॉप्टर मागे वळवण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही मिनिटांतच हेलिकॉप्टर जुहू पवनहंस येथे यशस्वीरित्या उतरवण्यात आले.
या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विनायक पात्रुडकर, सुरक्षा रक्षक आणि विमान कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यशस्वी लँडिंगनंतर सर्वजण उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. ठाणे आणि मुंबई परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे ही परिस्थिती ओढवली होती.



