नवी दिल्ली:
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि इतर विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आज दिल्लीत मोठा गदारोळ झाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थी जंतर-मंतरवरून संसदेच्या दिशेने कूच करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून, काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलक संसदेकडे जाण्यावर ठाम असल्याने संसद मार्ग आणि प्रेस क्लब ऑफ इंडिया जवळ सुरक्षा दलांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या कारवाईत काही विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी परिसरातील ५ मेट्रो स्टेशन बंद केली आहेत, तसेच इंटरनेट सेवा खंडित करून जॅमर्स बसवले आहेत.
नेत्यांची धरपकड आणि कलम १६३ लागू
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या आम आदमी पार्टीच्या (AAP) अनेक नेत्यांना आणि सीजेपीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने नवी दिल्ली परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिते’चे (BNSS) कलम १६३ लागू करण्यात आले आहे. ५ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असून, संसदेकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.

