नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली असून, या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या अनोख्या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, ते स्वतः या आंदोलनात सहभागी होण्यासाठी थेट अमेरिकेहून हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांविषयी केलेल्या एका कथित टिप्पणीनंतर दीपके यांनी सोशल मीडियावर या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली होती, ज्याला अल्पावधीतच ११ लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे अभिजित दीपके यांनी विमानतळावरून थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात जाऊन शांततापूर्ण निदर्शनांसाठी रीतसर परवानगी मागण्याची तयारी दर्शवली होती, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना विमानतळावर गर्दी न करता थेट जंतरमंतरवर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे, या आंदोलनाला सुप्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

