चिपळूण : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय बगाटे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे.
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा’ (पत्रकार संरक्षण कायदा) अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.
तपासाला वेग, दोषारोपपत्र लवकरच
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई आधीच केली आहे. “नागरिकांचे आणि पत्रकारांचे रक्षण करणे हे रत्नागिरी पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून न्यायालयात लवकरात लवकर दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले जाईल,” अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
पोलिस प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींच्या पाठीशी पोलीस प्रशासन ठामपणे उभे आहे. कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.



