चिपळूण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील असुर्डे-बौद्धवाडी फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास एक थरारक तिहेरी अपघात घडला. या भीषण अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून साडवलीच्या (देवरूख) दिशेने जाणारी एक भरधाव कार असुर्डे येथे आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी कारने समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका कारला आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
पादचाऱ्याचा दुर्दैवी अंत
अपघाताच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले स्थानिक ग्रामस्थ विजय बाबाराम सावर्डेकर (वय ५५, रा. असुर्डे सावर्डेकरवाडी) यांना या वाहनांची जोराची धडक बसली. या धडकेत सावर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे असुर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
जखमींची अवस्था
या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
वाहतूक विस्कळीत
अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या प्रकरणी सावर्डे पोलीस अधिक तपास करत आहेत.



