मुंबई :
पुण्याच्या एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यावरून सुरू झालेला वाद आता महाराष्ट्रात भाजप आणि मनसेमध्ये चांगलाच पेटला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी लावलेला पंतप्रधान मोदींचा फोटो मनसे कार्यकर्त्यांनी हटवला होता.
या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’बाहेर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, मनसे कार्यकर्त्यांची जोरदार तयारी आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना तिथे पोहोचताच आले नाही. पोलिसांनी महाडिक यांना माहीम परिसरातूनच ताब्यात घेतले, त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणे फसले.
या फोल ठरलेल्या आंदोलनावरून आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याच युवा आघाडीला जाहीर व्यासपीठावरून खडे बोल सुनावले आहेत. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “कालचा आलेला एखादा पोरगा काहीही बोलतो आणि फोटो काढतो, तर आपण त्याच्या विरोधात आंदोलन करायला नको.” अशा प्रकारची आंदोलने टाळण्याचे आवाहन करत, पक्षाला तरुणांना सुशिक्षित करायचे आहे, त्यांना गुंड बनवायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात भाजयुमो प्रदेशाध्यक्षांची चांगलीच फजिती झाल्याची चर्चा रंगली आहे.



