संगमेश्वर : (प्रतिनिधी)
मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड परिसरात रस्ता खचल्याने, मोठ्या भेगा पडल्याने आणि संरक्षक भिंत थेट दरीत कोसळल्याने हा मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी नुकतीच रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांनी पत्रकार संतोष पोटफोडे व रमेश शिंदे यांच्यासमवेत केली. पाहणीदरम्यान ओझरे खिंडीतील प्रवासी मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसून आले असून, रस्त्याला पडलेल्या भेगांच्या दोन्ही बाजूंना खोल दऱ्या असल्याने वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात मोठे अडथळे येत असून सध्या खचलेल्या भागावर प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून एक फूट उंचीचा सिमेंटचा कट्टा बांधून लोखंडी पत्र्यांच्या साहाय्याने धोकादायक भाग बंदिस्त करण्यात आला आहे. मात्र, ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असून या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घाटातील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून कोल्हापूर आगारातून आंबा घाट मार्गे येणाऱ्या एसटी बससेवाही थांबवण्यात आल्या आहेत. त्यातच दाट धुक्यामुळे रात्रीच्या वेळी या घाटातून प्रवास करणे अधिकच जीवघेणे ठरत आहे.
अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा घाट वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला होईल का, याबाबत चाकरमान्यांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, आंबा घाटातील एसटी वाहतूक बंद पडल्यामुळे साखरपा परिसरातील नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन आंबा घाटातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत रत्नागिरी आणि देवरुख आगाराने साखरपा मार्गे रत्नागिरीसाठी पर्यायी एसटी बससेवा त्वरित सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.






