रत्नागिरी :
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील एक थक्क करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील ५७ वर्षीय रहिवासी सुधीर तुकाराम मोहिते यांच्या चेहऱ्यात अडकलेला स्फोटातील धातूचा तुकडा तब्बल ३३ वर्षांनंतर यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला आहे. १२ मार्च १९९३ च्या स्फोटावेळी मोहिते हे वरळी परिसरातील पासपोर्ट कार्यालयाजवळील एका उपहारगृहाजवळून १७२ क्रमांकाच्या बसने प्रवास करत होते. त्यावेळी झालेल्या भीषण स्फोटात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर मलमपट्टी आणि प्रथमोपचार केले होते. मात्र, त्यावेळी स्फोटातील धातूचा एक छोटा कण त्यांच्या चेहऱ्यातच रुतून बसल्याची कल्पना कोणालाही आली नाही. विशेष म्हणजे, गेली ३३ वर्षे हा तुकडा शरीरात असूनही त्यांना त्याचा कसलाही शारीरिक त्रास जाणवला नाही.
या धक्कादायक प्रकाराचा उलगडा नुकताच झाला, जेव्हा मोहिते यांना सौम्य स्वरूपाचा मेंदूचा झटका आल्यामुळे ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी आधुनिक यंत्राद्वारे त्यांच्या मेंदूची तपासणी सुरू केली असता, यंत्रातून अचानक विचित्र आवाज येऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीने यंत्रातून बाहेर काढले. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल तपासणीत त्यांच्या वरच्या ओठाजवळील एका लहान गाठीमध्ये हा धातूचा तुकडा अडकल्याचे निदर्शनास आले. मेंदूच्या झटक्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर, ११ सप्टेंबर रोजी रुग्णालयातील डॉ. कुमार ऋषी यांनी शस्त्रक्रिया करून हा धातूचा तुकडा सुरक्षितपणे बाहेर काढला. आता हा तुकडा पुढील वैज्ञानिक आणि न्यायवैद्यक विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार आहे.



