ठाणे: २००८ सालच्या बहुचर्चित कल्याण रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर झाले होते. या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. “घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो, मी नाशिकला होतो,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी न्यायालयासमोर मांडली.
न्यायाधीशांचे प्रश्न आणि राज ठाकरेंची उत्तरे
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना चार प्रमुख प्रश्न विचारले. उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण झाल्याच्या आरोपावर विचारले असता, त्यांनी हे आरोप ‘खोटे’ असल्याचे सांगितले. तसेच, कार्यकर्त्यांच्या खिशात मनसेचे ओळखपत्र सापडल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी ही खोटी केस असल्याचे नमूद केले.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न चिथावणीखोर भाषणाबाबत होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “या केसला आता २० वर्षे होत आली आहेत. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा मी ठाणे किंवा कल्याण परिसरात नव्हतो, तर मी नाशिकमध्ये होतो.”
काय आहे प्रकरण?
२००८ मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. स्थानिक मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी मनसेने हे आंदोलन छेडले होते. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह अन्य सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
२०१९ पासून या खटल्याच्या सुनावणीला गती आली असून, आज राज ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून आपली कायदेशीर बाजू मांडली. या प्रकरणाचा पुढील निकाल काय लागणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



