पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास विकास लवांडे एका कार्यक्रमानंतर आपल्या गाडीने परतत असताना तीन गाड्यांमधून आलेल्या १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. या हल्लेखोरांनी लवांडे यांच्यावर काळी शाई फेकली आणि त्यांना धक्काबुक्की केली.
विकास लवांडे यांनी या कृत्यासाठी संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांना जबाबदार धरले आहे. लवांडे यांनी असा खळबळजनक दावा केला आहे की, हल्लेखोरांनी केवळ शाईफेक केली नाही तर त्यांना पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यांनी हल्लेखोरांचा उल्लेख ‘वारकरी संप्रदायातील नथुराम गोडसे’ असा करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या वैचारिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक चर्चा आहे. घटनेनंतर लवांडे यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



